Tags

, , ,

Namaskaar friends

For the first time making an attempt to post in Marathi language. This is a wonderful article based on teachings of Swami Samarth Ramdas and written by a young devotee, Smt Mukta Walvekar of Hyderabad, Telangana State.

Mukta is an IT professional and along with her husband Pramod, has been studying Samarth literature and works for many years. Mukta is a disciple of Dr. Shrikrishna D. Deshmukh (Dr Kaka) and studying under his guidance. Humble, dedicated, down-to-earth, committed, soft spoken, deeply knowledgeable and always ready to help seekers pursuing the spiritual path; these are the traits of this young lady. I have never met her but know her from my few phone conversations with her on Samarth teachings.

Swami Samarth is one of the most well known names in a galaxy of Saints that the pious land of Maharashtra has been blessed with. He roamed the whole country on foot in the 17th Century and is best known for his epic work “Dasbodh” containing teachings useful for both material success as well as spiritual success simultaneously. The Dasbodh is in the form of a dialogue between a student and teacher, and is a classic text on Advaita Vedanta on the lines of teachings of Adi Sankaracharya. Samarth Ramdas greatly respected Sankara and many of Bhagavan Sankara’s teachings are reflected in Dasbodh and other texts he wrote, like Manache Shlok. He was very close to the great Maratha King Chhatrapati Shivaji Maharaj at whose request he had settled on Sajjangad Fort near Satara, close to Pune, and where his Samadhi lies today making it an important pilgrimage place.

Until I read Mukta’s articles I had had no previous exposure to Dasbodh but once having had a ‘peep in’ to the great teachings, am now an ardent follower of the teachings. If you understand Marathi it will be a great pleasure to read this article and some more that Mukta has kindly permitted me to post here. Please leave you feedback and comments.


मना रे जनी मौनमुद्रा धरावी

यं वर्णयितुं साक्षाच्छृतिरपि मूकेव मौनमाचरति । सो‍ऽस्माकं मनुजानां किं वाचां गोचरो भवति || (प्र. सु. २-९)
– ‘श्रुतीदेखील ज्याचे वर्णनप्रसंगी मौन धारण करते, तो आत्मा मनुष्याच्या वाणीला गोचर होईल काय?’.

 ‘Aggressive Marketing’ हा आजच्या युगाचा मंत्र आहे. दैनंदिन व्यवहारातील कला, क्रीडा, नोकरी, व्यवसाय इ. सर्व क्षेत्रांमध्ये प्रत्येक कृती जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचंड चढाओढ दिसून येते. वर्तमानपत्र, दूरदर्शन, Social Media, Mobile Marketing, Email Marketing, WhatsApp असे नवनवीन Platforms त्यासाठी उपलब्ध आहेत. बोलणाऱ्यांची गाजरे विकतात, न बोलणाऱ्यांची केळी देखील विकले जात नाही अशी शिकवण मुलांना बालवयापासून दिली जाते. Communication Skills विकसीत करण्यासाठी विविध उपक्रम सर्वत्र राबविले जातात. व्यवहाराच्या दृष्टीने ते योग्यही आहेत. मनोबोधात मात्र समर्थ मना रे जनी मौनमुद्रा धरावी हा संदेश आपणांस देतात. समर्थांना अभिप्रेत असलेले मौनाचे स्वरूप, प्रकार, उद्देश, फायदे आणि चालू युगात मौनाची आवश्यकता ह्यासंदर्भात चिंतन करू.

 मौन कशासाठी पाळायचे? त्याचा उद्देश काय? आजच्या कोलाहलग्रस्त जीवनामध्ये दररोज किमान काही क्षण अंतर्बाह्य शांतता (Silence) अनुभवण्याचे महत्व आधुनिक विज्ञान मांडते. The Power of Silence चे विस्तृत वर्णन वैद्यकशास्त्राने केले आहे. प्रसिद्ध डॉ. पॉल हेदर शांतता पाळल्याने होणारे फायदे सांगतो  –

Silence

  • Lowers blood pressure, allows you to deal with life’s challenges in a better way.
  • Boosts immune system.
  • Reduces stress, lowers blood cortisol and adrenaline levels.
  • Regulates hormones and interaction of all hormone related systems.
  • Keeps plaques from forming in arteries, helps to prevent cardiovascular diseases.

 परंतु वैद्यकशास्त्राने पुरस्कृत केलेले वाणी नियंत्रित करण्याचे वरील फायदे केवळ शरीरस्वास्थ्याशी निगडीत आहेत.

पारमार्थिक पातळीवर मौनाचा संबंध मुख्यतः मनाशी असून, त्याची भूमिका बरीच विस्तृत आणि व्यापक आहे. गीतेमध्ये मौनं चैवास्मि गुह्यानां (१०-३८) असे विभूतीयोगाचे वर्णन आहे. गुप्त राखण्यायोग्य जेवढे भाव आहेत, त्यांतील मौन (वाणीचा संयम) ‘माझी विभूती’ आहे असे भगवंताचे वचन आहे. मौनाचरणाने मनाचे सामर्थ्य वाढते. शब्दातीत भगवंताचे स्वरूप आकलन करणे शक्य होते. गोंदवलेकर महाराज म्हणतात – ‘न बोलण्याने वाचणारी शक्ती, बुद्धी व वेळ परमात्मचिंतनाकडे लागावा व मन स्वस्थ व एकाग्र व्हावे हा मौनाचा खरा हेतू होय.’

व्यवहारात अबोल असणाऱ्या व्यक्तींचे विविध प्रकार आढळतात. कोणाचा तो मूळ स्वभाव असतो, तर कधी विशिष्ट प्रसंगामुळे मनुष्य अबोला पत्करतो. अपघात, संबंधित व्यक्तीचा अचानक मृत्यू, दुर्धर आजार, गतकाळातील वाईट स्मृती, भविष्याची अनावश्यक चिंता, भय अशा अनेक कारणांनी मनुष्य मौनावतो. कठोर, अनोळखी, नासमज, अप्रिय अथवा अत्यंत प्रभावशाली व्यक्तीशी सामना झाल्यास वाणी शांत होते. कधी वादावादी टाळण्यासाठी अथवा प्रसंगानुरूप योग्य माहिती नसल्यास बोलणे कमी होते. चूक वर्तणुकीची खंत वाटून अपराधी मनोवृत्तीमुळे बडबड थांबते. ही कारणे रास्त असली तरी स्वरूप-संशोधन करतांना अशा अबोल्याचा फारसा उपयोग नाही. तो असता तर सर्व मूक लोक अथवा हठयोगाने वाणीचा निरोध करणारे योगी जीवन्मुक्त झाले असते. मोक्षासाठी विचारपूर्वक पत्करलेले मौनच अपेक्षित आणि उपयोगी आहे.

वाङ्ग्मौन, इन्द्रियमौन, काष्ठमौन, सुषुप्तिमौन इ. मौनाचे प्रकार मानले जातात. त्यातील सर्वांत प्रचलीत म्हणजे वाङ्ग्मौन अथवा अभाषण, अर्थात् वाणीने न बोलणे. परा, पश्यन्ति, मध्यमा, वैखरी असे वाणीचे क्रमाने सूक्ष्मतम ते स्थूलतम चार स्तर आहेत. समर्थ त्यांचे वर्णन समर्पकपणे करतात – उन्मेष परा ध्वनि पश्यन्ती | नाद मध्यमा शब्द चौथी | वैखरीपासून उमटती | नाना शब्दरत्ने || (दा.बो. १२-५-८). परावाचा सर्वांत सूक्ष्म, ओंकाराचे पहिले स्वरूप व केवळ वायुरूप जाणिवेचे स्फुरण आहे. पश्यन्ती वाणी ध्वनिरूप असून अंतःकरण अथवा सूक्ष्म देहाला व्यापून राहाते. मध्यमा नादरूप असून पश्यन्ति-वैखरी ह्यांना साखळीप्रमाणे जोडते. वैखरी वाणी सर्वात स्थूल असून ती अव्यक्ताला व्यक्त करते. शब्द, सूर अथवा उच्चार वैखरीतून प्रकट होतो. परेचें स्थान नाभि, पश्यन्तीचे हृदय, मध्यमेचे कंठ व वैखरीचे स्थान मुख होय.

आपण बोलतांना आधी परावाणीत स्फुरण, मग पश्यन्तीत ध्वनी, मध्यमेत नाद व शेवटी वैखरीत प्रत्यक्ष शब्द उमटतो. सामान्यतः वाङ्ग्मौन म्हणजे ‘वैखरीने न बोलणे’ समजले जाते. परंतु, वाणीसंयमाचे दिशेने ते पहिले पाऊल असून मौनाचा तो स्थूल स्तर आहे. आपण जेवढे वैखरीने स्पष्ट बोलतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक संभाषण मध्यमेत आणि पश्यन्तीमध्ये करतो. ह्या आतल्याआत बोलण्याला ‘विचार’ असे म्हणतात. मुळात वैखरी वाणीला विराम देणे व्यवहारात अनेकांना जड जाते. कुटुंब, नोकरी, व्यवसाय, समाज, बातम्या, दूरदर्शन मालिका, क्रिकेट, मनोरंजनाचे कार्यक्रम, सण-समारंभ, वाढदिवस, Stock Market इ. नाना विषय अखंड आपल्या संभाषणाचा अथवा विचारांचा विषय बनतात. ‘The biggest challenge after success is shutting up about it.’ अशी एक प्रसिद्ध म्हण आहे. जीवनात छोट्यामोठ्या प्रसंगात स्वतःची बढाई मारणे ही सवय होऊन बसते आणि तिच्यापासून सुटका होणे अतिशय अवघड होते. ज्ञानेश्वर महाराजांचे ह्यासंदर्भात सुंदर वचन आहे ‘अनंत वाचाळ बरळती बरळ | त्या कैसेनि दयाळ पावे हरी‘ (ह. पा. ७-३). ‘आत्मरूप हरी दयाळू असला तरी अनावश्यक आणि अखंड बडबड करणाऱ्यांना तो कसा प्रसन्न होईल?’ अर्थात्, हरीला प्रसन्न करून घेण्यासाठी वाणीचा संयम करणे आवश्यक आहे.

वैखरी शांत करता आली तरी आतील वाणींचे व्यवहार थांबविणे महाकठीण आहे. मन अस्वस्थ, अशांत असेल अथवा मध्यमेने आतल्याआत चडफडत बोलणे चालू असेल, तर वरकरणी सांभाळलेला अबोला म्हणजे खरे मौन नव्हे. ती केवळ स्वतःशी केलेली प्रतारणा आहे. वैखरीच्या मौनाने सुरुवात करून पुढे ते मध्यमा, पश्यन्ती, परेपर्यंत नेणे हा मौनाचा अपेक्षित आणि उपयुक्त क्रमविकास आहे. ज्या आत्मस्वरुपाशी अनुसंधान साधावयाचे तेथे वाणीचा शिरकाव होत नाही. केन श्रुती म्हणते – आत्मा वाणीते चकवी | अक्षर, शब्दांते भुलवी | वेदां नेति नेतिबोलवी | अगम्यपणे || (केन. उप. १-६१). अर्थात्, ‘आत्मा वाणीला सापडत नाही, अक्षर व शब्दांना भूल पाडतो, अगम्य असल्याने वेदांनाही ‘नेति’ असे म्हणावयांस लावतो.’ शब्दातीत आत्मस्वरूपाच्या जवळ जाण्यासाठी वाणींचा लय होणे आवश्यक आहे. तो लय करण्याची कला श्रीगुरू आपल्याला शिकवितात. भूतभविष्याचे अनावश्यक चिंतन, सामाजिक अथवा राजकीय मुद्द्यांवर निरर्थक चर्चा, अनुत्पादक विचार, दैनंदिन व्यवहाराशी सुसंगत नसलेले विचार झटकून टाकले तर मौन साधणे सोपे होते. प्रामाणिकपणे संतविहीत निष्काम कर्म केले असता कुठल्याही कृतीची टोचणी लागत नाही, अंतःकरण शुद्ध व शांत राहाते व वाङ्गमौन लवकर साधते.

वाचेचे मौन आदर्श असले तरी रोजच्या व्यवहारामध्ये अखंड पाळणे सामान्य साधकांना अशक्य आहे. दैनंदिन व्यवहार वाणीने बोलल्याशिवाय सिद्ध् होत नाही. त्यासाठी दयाळू संत मौनाचे व्यवहार्य पैलू समजावून सांगतात.

श्रद्धेने केलेले नामस्मरण मौनाचाच प्रकार आहे अशी सद्गुरू आणि सर्व संतांची शिकवण आहे. पुढे वैखरी राम आधी वदावा (म.बो. ३) आणि रघुनायकावीण बोलो नको हो (म.बो. ४३) हा समर्थांचा बोध सर्वार्थाने आचरणीय आहे. सकाळी उठल्यापासून शरीर व वाणीचे विविध व्यवहार सुरु होतात. साधकाने तत्पूर्वीच भगवंताशी अनुसंधान साधावे. शांत वातावरणात, प्रसन्न चित्ताने वैखरी वाणीने मोठ्याने आपल्या आराध्य दैवताचे नाम घ्यावे. ह्या नामामध्ये सातत्य आले की पुढे तेच क्रमाक्रमाने सूक्ष्म होत मध्यमा, पश्यन्ती आणि परेपर्यंत जाते. रामनामाचे जे स्मरण | या नांव गा महामौन || (ए. भा. ३-४२६) असे नाथ महाराज म्हणतात. आवश्यक व्यवहार आटोपला की उरलेला सर्व काळ फक्त भगवंताविषयीच बोलावे, त्याचेच चिंतन करावे. नुसते पहाटे नाम घेऊन ते सोडून न देता, दिवसभरही यथाशक्ति, नेटाने नाम घ्यावे. वाणीमध्ये नाम स्थिर झाले की बाकीचे अनावश्यक विचार आपोआप गळून पडतात. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात – नामपाठ मौन प्रपंचाचे‘ (हरीपाठ ९-४) त्याप्रमाणे प्रपंचाचे मौन म्हणजेच प्रापंचिक द्वंद्वांचा उपशम होतो.

संत एकनाथांनी मौन म्हणजे ‘वाणीचा संयम’ म्हणजे असा सुंदर पैलू मांडला आहे – मौनीन बोलावे इतुकें जाण | मिथ्यालाप असम्भाषण | नित्य करावे वेदपठण | गायत्रीस्मरण का हरीनाम || (ए. भा. १९-३८८). साधकाने अधिक बोलू नये. खोटे बोलू नये. अपशब्द बोलू नये. नित्य वेद्पठण, गायत्री मंत्राचा जप अथवा हरि नामस्मरण करावे.’ वाणी-संयमाचा मूळ उद्देश शब्दातीत आत्मस्वरूपाचे चिंतन करून त्याची प्रचीती घेणे हा आहे. तो साध्य होण्यासाठी साधकाने शक्य तेवढे मोजून-मापून बोलावे. व्यवहारात ‘जेवढे जास्त अनावश्यक बोलू तेवढे जास्त निस्तरावे लागते’ हा सर्वांचा अनुभव आहे. मुळात साधकाला गरजेपेक्षा जास्त बोलण्याची इच्छाच होऊ नये. जनी वाउगे बोलता सौख्य नाही‘ (म. बो. २३) ही समर्थांची शिकवण कायम ध्यानात ठेवावी. ज्यावाचून अडले नाही असे संभाषण पूर्णतः टाळावे. जेथे आपले मत विचारले नाही अथवा जेथे किंमत नाही तेथे मत व्यक्त करू नये. जास्त आणि वायफळ बोलण्याने अंतरंगातील शक्तीचा अपव्यय होतो. गोंदवलेकर महाराज म्हणतात – ‘परमात्मचिंतनाचा मुख्य हेतू सांभाळून गरजेपुरतें बोलले तर मौनभंग झाला असे समजू नये.’ वाणीचा असा संयम सर्व स्तरावरील साधकांना नक्कीच अभ्यासनीय व फलदायी आहे.

गीतेमध्ये १७व्या अध्यायात भगवंत वाचिक तपाचे मार्गदर्शन करतात. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् | स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्ग्मयं तप उच्यते || (१७-१५). दुसऱ्याला उद्वेग न आणणारे आणि हितकारक बोलावे. सत्य बोलावे, प्रिय बोलावे परंतु अप्रिय, नुकसानदायी अथवा टोचणारे सत्य बोलू नये. श्रुती, स्मृती आणि संतवाङ्ग्मयाचा अभ्यास, सखोल चिन्तन आणि नामस्मरण करावे. ह्य सर्व कृती वाचिक तपाचे स्वरूप आहेत. समर्थांनी व्यवहारामध्ये काय व कसे बोलावे (अथवा बोलू नये) ह्या संदर्भात जागोजागी मार्मिक बोध केला आहे. वेड्यास वेडे म्हणो नये | वर्म कदापि बोलों नये |’ (१३-१०-२६)बोलीला बोल विसरों नये | प्रसंगी सामर्थ्य चुकों नये |’ (२-२-१२) हे दासबोधातील मार्गदर्शन ध्यानांत ठेवावे. वेड्या मनुष्याला स्पष्टपणे दोष दाखवून दुखवू नये, संबंधितांचे वर्म काढणे टाळावे, आपण स्वतः एकदा मांडलेले मत विसरू नये. नम्र आणि गोड बोलावे परंतु प्रसंग आला असता चातुर्याने आपली सामर्थ्याची चुणूक अवश्य दाखवावी. अशा प्रकारचे वाचिक तप करणे व्यवहारात नक्कीच शक्य आहे. त्यायोगे अशब्द आणि अरूप आत्म्याची प्रचिती येणे निश्चित सोपे होते.

‘मुनेर्भावः’ असा मौन शब्दाचा अजून एक अर्थ आहे. मुनी मननशील असतो. तो स्वभावतःच आत्मस्वरूपाचे अखंड मनन करतो. वासुदेवः सर्वमिति ह्या उक्तीप्रमाणे त्याला सर्वत्र भगवद्स्वरुपच दिसते. त्याच्या अंतःकरणातील प्रत्येक वृत्तीमध्ये स्वरूपाचे अनुसंधान असते. आपण साधकांनी देखील मौनाचा अभ्यास करतांना भगवद्स्वरुपाचे नित्य मनन करण्याची कला विकसीत करावी. त्यासाठी जे जे देखिजे भूत | ते ते मानिजे भगवंत ||’ हा सोपा उपाय ज्ञानेश्वर महाराज सांगतात. श्रुती म्हणते – सर्वत्र आत्मा जाणे | सारेचि व्यापिले तेणे | काही नसे वेगळेपणे | आत्मतत्वा || (ईश. उप. ८०). ह्या चराचरात अंतर्बाह्य सर्वांना व्यापून एक आत्माच आहे असा निश्चय केल्यावर आत्मतत्वापासून वेगळी कुठलीच जाणीव शिल्लक राहत नाही. मुनींचा तो स्थायी-भाव असतो. गीतेमध्ये आपल्या प्रिय भक्ताचे वर्णन करतांना तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी हे लक्षण भगवंताने सांगितले आहे. निंदा-स्तुती, अनुकूल-प्रतिकूल, राग-द्वेष, जय-पराजय, संयोग-वियोग, मान-अपमान इ. सर्व द्वंद्वांशी सामना करतांना समबुद्धी ठेवणे हे सिद्ध-भक्ताचे महत्वाचे लक्षण होय. ह्याच अवस्थेला ‘सुषुप्ती मौन’ असेही मानले जाते. सिद्धांचे लक्षण तेच आम्हा साधकांचे साधन मानून, व्यवहार करतांना समत्व बुद्धी स्थिर ठेवणे हे मौनाचरणच होय. मननशीलता आणि सम-बुद्धी सतत टिकवता आली की त्यायोगे मुनिसारखे आत्मरती आणि आत्मक्रीड राहणे शक्य होते. वाणीवर नियंत्रण हे मौनाचे केवळ एक उपलक्षण आहे. कर्मेंद्रियांचा व ज्ञानेंद्रियांचा संयम देखील त्यामध्ये अपेक्षित आहे. मौनव्रत पाळणाऱ्या काही व्यक्ती वही-पेन घेऊन दिवसभर लिहित बसतात. कोणी खाणाखुणा करून इतरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. ‘मी केलेली एवढी साधी खुण तुला कळली कशी नाही?’ म्हणून संबंधीतांवर चिडणारे लोक देखील आहेत. अशा व्रताचा काय उपयोग? इंद्रियांचा ‘दम’ कसा साधावा हे सुरेख मार्गदर्शन सद्गुरू आणि संत आपल्याला करतात. मन गया तो जाने दे | मत जाने दे शरीर | नाही खिची कमान तो | कहांसे छूटेगा तीर || हे कबीरांचे वचन प्रसिद्ध आहे. मनाला आवर घालता येत नसेल तर किमान परमार्थाला निषिद्ध वर्तन करू नये. आतमध्ये राग असला, तरी त्याची अभिव्यक्ती म्हणून मारहाण करणे, तोंडाने अद्वातद्वा बोलणे टाळावे. रजोगुणी व तमोगुणी संगत कटाक्षाने टाळावी. इंद्रियांना वळण लावण्यासाठी सदा देवकाजी झिजे देह ज्याचा (मनोबोध-) हा सुंदर मार्ग समर्थ दाखवितात. श्रवण, कीर्तन, पादसेवन, वंदन, अर्चन, दास्य ह्यांपैकी आपल्याला भावेल ती भक्ती करून सगुण देवाशी अनुसंधान ठेवल्यास, निर्गुण आत्म्याचे चिंतन करतांना इंद्रिये स्वस्थ ठेवणे निश्चित सोपे होते.

नरदेह हे आपल्याला मिळालेले मोठे घबाड होय. त्याचे सार्थक करण्यासाठी आयुष्याचिया साधने | सच्चिदानंद पदवी घेणे हा संदेश तुकाराम महाराज देतात. साधकाचा जीव सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप आत्म्याशी एकरूप झाला की जीव कृतार्थ होतो. ज्याच्याशी एकरूप व्हायचे आहे तो आत्मा निराकार, निर्गुण, निरवयव आहे. तो अरूप असल्याने त्याचे वर्णन करता येत नाही. मनवाणी जेथे | जाणावया पाहाते | न जाणिता परते | ब्रह्मतत्व ||’ (तै. उप. २-९) – वाणी आत्म्याच्या दारात जाऊन तो न सापडल्याने मनासह परत येते’ असे श्रुती सांगते.

शब्दातीत आत्मतत्व मी आहे हे अनुभवण्यासाठी मौन उत्तम साधन आहे. प्रापंचिकांसाठी वाणीचा संयम, वाणीचे तप, अखंड नामस्मरण हे मौनाचे व्यवहार्य आविष्कार आहेत. त्यांचे यथायोग्य पालन केल्याने मननशीलता वाढते, वृत्ती अंतर्मुख होते, अनावश्यक वादावाद टळतो, वेळ आणि उर्जेचा अपव्यय वाचतो, आत्मसंयम वाढतो, चित्त एकाग्र होते आणि अंतःकरण क्रमाक्रमाने शुद्ध व शांत होते. आपण साधकांनीही मौनमुद्रेचा योग्य अवलंब केला तर सूक्ष्म आणि गंभीर आत्मतत्वाची अनुभूती येऊन जीवन निश्चितपणे कृतार्थ होईल!

 आत्मा करणां कहीं ना कळे, आणि प्रमाणा कसा आकळे |
फुका न आता उगा वळवळे
, तूहि न तेथ ठरे ||
मौन धरी रे
, मौन धरी रे, मौन धरी मन रे, सखया, मौन धरी तू रे ||
(डॉ. श्री. द. देशमुख पावा काव्यसंग्रह)

|| श्रीकृष्णार्पणमस्तू ||


(The above post appeared in ‘Sajjangad’ monthly magazine in September 2016 and is reproduced with their kind permission)

Please see http://www.samarthramdas400.in/eng/home.php for more info, literature, audio, video

Mukta’s blog https://vedantbhaskar.blogspot.in/ where she is publishing  translations of Dr. Kaka’s texts

Pranaam from Kamal Kothari

Advertisements